Saturday, September 8, 2018

महाराष्ट्राला एक नको तर अनेक "तुकाराम' हवेत


आजपर्यंत सदाशिव तिनईकर, गो.रा. खैरनार, अरुण भाटिया यांच्या सारखे धडाडीचे अधिकारी राज्याला लाभले. त्याच पंक्तीत तुकाराम मुंढेंचा समावेश करावा लागेल. हे आज नाशिकला आहेत उद्या जर मायबाप सरकारच्या मनी आले तर त्यांना गडचिरोलीलाही (शिक्षा म्हणून ) पाठविले जाईल. ते जातीलही आणि तेथेही ते जनतेचे "तुकाराम' म्हणूनच काम पाहतील. राज्याला म्हणूनच एक नको अनेक "तुकाराम' हवेत असे वाटते. 
देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड कधी संपणार ? हा प्रश्‍न गेल्या साठ वर्षापासून लोक विचारत आहेत. पण, कीड कोणी नष्ट करू शकली नाही. अद्याप या किडीचा नाश करणारी फवारणी निर्माण झाली नाही. सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराला अधिकारी आणि कर्मचारी जितके जबाबदार असतात. तितकेच जबाबदार राज्यकर्ते आणि आपणही असतो.
प्रशासनात सर्वच अधिकारी भ्रष्ट असतात असेही नाही. काही चांगल्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर लोकांचा विश्वास आहे. पैसे खाणार नाही आणि खाऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन उच्चपदावर काम करणारे असंख्य अधिकारी आहेत. त्यापैकीच एक नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे. 
यापूर्वीच्या कर्तबगार अधिकाऱ्यांनाही किंमत मोजावी लागली पण, आपल्या कर्तव्यापासून ते यत्किंचितही मागे हटले नाहीत. जनतेच्या हितासाठी काम करताना राज्यकर्त्यांचा रोष स्वीकारलेले खमके अधिकारीही प्रशासनात होऊन गेलेत. असे अधिकारी कधी दडपण घेऊन काम करण्याची शक्‍यता नसते.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बदलीला तर कधीच घाबरत नाही. बदली हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. सदैव बदलीसाठी ते तयार असतात त्यांनी बॅगा व सामान बांधून तयारच ठेवलेले असते. 
स्वच्छ आणि पारदर्शी कारभार पाहणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेहमीच स्मरणात राहातात. या ना त्या कारणाने ते आठवतही जातात. आदर्श आणि स्वच्छ अधिकारी अशी ओळख नाशिकचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची झाली आहे. जेथे जेथे ते जातात तेथील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना धडकी का बसते हे कळत नाही ? लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत तर त्यांना कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना घाबरण्याचे कारण काय ?
जर लोकच त्यांना साथ देत असतील तर नेते मंडळींनी त्यांना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ते डगमगत नाहीत. मुळात असे अधिकारी चुकीचे काही करण्यास तयार नसतात. नियमात काम बसत असेल तर ते कधीच अडवणूक करीत नाहीत असाच सर्वसाधारण जनतेचा अनुभव असतो. भ्रष्ट आणि खादाड नेत्यांना असले अधिकारी जवळ उभे करीत नाहीत हेच त्यांचे दुखणे असते. 
सत्ताधारी असो की विरोधीबाकावरील नेते. त्यांना आपले ऐकणारा अधिकारी खूप प्रिय असतो. म्हणून सरकार बदलले की अधिकारीही बदलले जातात. आपल्या विश्वासातील अधिकाऱ्यांची नियुक्ती ते करीत असतात.
काळेगोरे म्हणून जे काही उद्योग असतात ते लपविण्याचे कौशल्य लाडके अधिकारी करीत असतात. त्यातूनच भ्रष्टाचार फोफावतो. जनतेच्या पैशावर सत्ताधारी आणि राज्यकर्ते उड्या मारतात. मात्र प्रामाणिक अधिकाऱ्यांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. अर्थसत्यमधील इन्स्पेक्‍टर वेलवणकर कुणालाच नको असतात. 
बदली करण्याचा अधिकार सरकारला असल्याने ते प्रामाणिक अधिकाऱ्यांना सारखे नाचवीत असतात. त्यामागे कारण असे असते की आपल्या नेत्यांना, पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारे अधिकारी जिल्ह्यात, तालुक्‍यात हवे असतात. कोणता "एसपी", जिल्हाधिकारी किंवा "पीआय' हवा हे स्थानिक आमदार ठरवितात.
काही वेळा असे चित्र पाहण्यास मिळते की तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही एखादा अधिकारी तेथेच राहतो. जोपर्यंत तेथील आमदाराची मर्जी आहे तोपर्यंत त्याला कोणी धक्काही लावत नाही. याचा काय अर्थ काढायचा ? मात्र जनता काही खुळी नसते. त्यांना सर्व समजत असते. 
मुंढे हे बीड जिल्ह्यातील ताडसौन्ना सारख्या खेड्यातून आले आहेत. प्रारंभी शिक्षक आणि त्यानंतर ते कलेक्‍टर बनले. सोलापूरचे जिल्हाधिकारी ते नाशिकचे आयुक्त असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 2005 पासून त्यांनी धडाकेबाज निर्णय घेऊन राज्यकर्त्यांसह भ्रष्ट मंडळींना धडा शिकविला आहे. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्‍टरांना निलंबित केले होते.
नागपुरात "सीईओ' असताना काही शिक्षक अधिवेशन पाहण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांनी पहिल्याच दिवशी शाळेला भेटी दिल्या असता शिक्षक जागेवर नव्हते. हे लक्षात येतात शिक्षकांना निलंबित केल्याने ते प्रकाशझोतात आले. पुण्यात "पीएमपीएमएल'चा कारभार सांभाळताना बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कुणाचाही मनमानी कारभार ते चालू देत नाहीत. शिस्तीचे भोक्ते असल्याने नेते, पुढारीऱ्यांना त्यांची धास्ती वाटते. 
कुठे मानापानाचे निमित्त करून तर कुठे अधिकाराचे मुद्दे निर्माण करून त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना विरोध होताना दिसतो आहे. मुंढे यांनीही सर्व गोष्टी आपल्या मनानुसार आणि नियामानुमसारच होणे शक्‍य नाही याचे भान राखावे.
चांगल्या अधिकाऱ्यांवर दडपण आले आणि दोन चार प्रकरणात त्याला न्याय देता आला नाही तरी तो शेकडो गोरगरिबांची कामे करू शकतो. त्यांना न्याय देऊ शकतो. रात्रीतून घडवू शकतो. त्यामुळे मुंढे यांनी 20:20 क्रिकेट सामन्यातील खेळाडूंची मानसिकता सोडून कसोटी क्रिकेटपटूंची मानसिकता धारण करावी. खेळपट्टीवर टिकून राहणेही महत्त्वाचे असते. धावा होऊ शकतात हे ही लक्षात घेण्याची गरज आहे. 
मुंढे यांच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात. शेवटी लोकप्रतिनिधींचा मानसन्मानही ठेवणे गरजे आहे. मात्र त्यांच्याकडून तसे होत नाही. ते लोकप्रतिनिधींना किंमत देत नाही अशी त्यांच्याविषयी तक्रार आहे. त्यामध्ये तथ्य असूही शकेल. त्यांच्यावर राजकीय पक्षाचे नेते कितीही आरोप करोत पण, ते "मिस्टर क्‍लीन' आहेत यावर लोकांचा विश्वास आहे. यातच सर्वकाही आले.  

मुली उचलायला, काय मोगलाई लागली आहे का ?

ज्यात किती सुंदर मुलींचे चेहरे ऍसिड हल्ल्यात विद्रूप झाले. हे चेहरे विद्रूप करणारे एकतर्फी प्रेम करणारे गुंड होते. सांगलीत दिवसाढवळ्या अमृता देशपांडेचा खून तर उल्हासनगरात रिंकू पाटीलला जीवंत जाळण्यात आले. या निष्पाप मुलींनी जीव वाचविण्यासाठी केलेला आक्रोश महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे "बेटी बचाव'चा नारा देतात आणि त्याच पक्षाचे आमदार राम कदम दुसरीकडे मुली उचलण्याची भाषा करतात ? यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असू शकते. 
पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात आता कुठे महिलांना स्वातंत्र्य मिळाले. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या कुठे उंच भरारी घेता आहेत. आज असे कुठलेही क्षेत्र शिल्लक नाही की जेथे महिला नाही. सर्वत्र असे आशादायक चित्र असले तरी महिला आणि मुलींना एक स्त्री म्हणून आजही भोगावे लागते. अन्याय, अत्याचार सहन करावा लागतो. पुरुषी वर्चस्वाने ती दबलेली आणि पिचलेली आहे. 
आपण कितीही पुरोगामीत्वाच्या आणि सुधारणावादाच्या गप्पा मारत असलो तरी महिलांचे शोषण काही थांबलेले नाही. ते थांबेल असे वाटत नाही. स्त्री ही पुरुषाची दासी, गुलाम आहे ही विकृत मानसिकता आपल्या मनातून कधी निघणार नाही. राम कदम यांच्यासारखे वाचाळवीर आणि सामाजिक भान नसलेले बेजबाबदार नेते आपल्या अकलेचे तारे तोडतात. मुली पळवून आणण्याची भाषा करतात. अशा या भाजपच्या रामाचा निषेध करावा तितका कमीच आहे. माझी मुलगी उंबऱ्याबाहेर पडली तर ती सुरक्षित घरी येऊ शकते का ? अशा चिंतेत असलेल्या मायबापांना राम कदमांनी अधिक चिंतेत टाकले आहे. 
घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात कदम म्हणाले, की तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत मुक्ताफळे उधळली. कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले, की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा." वा रे वा बेट्या ! 
खरे तर दहीहंडी उत्सव हा विशेषत: तरुण-तरुणींचा. या उत्सवात आबालवृद्ध सहभागी होतात. जशी मुलं दहीहंडी फोडतात तसेच मुलीही कमी नाहीत. मुंबईतच नव्हे तर राज्यभर खास मुलींसाठीही दहीहंडी उत्सव होत असतात. याचाच अर्थ आपण समानतेने मुलामलींकडे पाहतो. हे वर्षानुवर्षे दहीहंडी उत्सव आयोजित करणाऱ्या कदमांनी लक्षात घेण्याची गरज होती. 
मुख्यमंत्री आले. बॉलिवूडसह मराठा तारका आल्या. कोट्यवधीची उधळण केली म्हणजे खूप शहाणे झालो. आपण काही बोललो तर लोक ते विनोदाने घेतात हा समज त्यांनी करून घेतलेला दिसतो. खरेतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान उपटण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनीही गोविंदा, गोपाळा म्हणत या उत्सवात सहभाग घेतला. ते कदमांच्या दहीहंडीलाही उपस्थित राहिले. पण, या उत्सवावर कदम यांनी पाणी फिरविले. त्यांनी उधळलेली मुक्ताफळे खरे तर भाजप सारख्या संस्कृती आणि परंपरेचा अभिमान सांगणाऱ्या पक्षातील नेत्यांनाही रुचला असेल वाटत नाही. 
सार्वजनिक जीवनात वावरत असताना सभ्यता बाळगावी लागते. शिवराळ बोलणे किंवा एखाद्याला शिव्याशाप देणे सोपे असते. पण, एक सुसंस्कृत नेते म्हणून वागणे, बोलणे किती अवघड असते हे कदमांना कोण सांगणार ? आपण खूप मोठे नेते आहोत. आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आहोत म्हणून आपण काहीही बोलले तर खपवून घेतले जाते असा जर कोणी समज-गैरसमज करून घेतला असेल तर त्यांनी तो डोक्‍यातून काढून टाकलेला बरा. 
कदम यांचे वादग्रस्त विधान संताप आणणारे का आहे ? याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण असे की, राज्यात कितीतरी सुंदर मुलींचे चेहरे ऍसिड हल्ल्यात विद्रूप झाले. हे चेहरे विद्रूप करणारे एकतर्फी प्रेमप्रकरणारे गुंड होते. सांगलीत अमृता देशपांडेचा, उल्हासनगरात रिंकू पाटील यांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. या निष्पाप मुलींनी जीव वाचविण्यासाठी केलेला आक्रोश महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. या घटनांनी समाजमन सुन्न झाले होते. 
कदम हे सार्वजनिक जीवनात आहेत त्यामुळे त्यांना या घटना कधी आठवत असतील किंवा त्यांना कोणी तरी आठवण करून देण्याची गरज आहे. हे सर्व का होते तर एकतर्फी प्रेमप्रकरणातून. टवाळखोर, मवाली आणि गुंडगिरी करणाऱ्या मुलांचा उच्चशिक्षित मुली कशा काय हात धरू शकतील ? एखादी मुलगी आवडली म्हणजे तिला मागण घालायचं. तिचा हात धरायचा. जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडायचे का ? 
आपल्या मुलीचे हात पिवळे करण्यापूर्वी तिचे आईबाबा आपला होणारा जावई कोणत्या संस्कृती वाढतो याचा विचार करतात. एखादी मुलगी डॉक्‍टर असेल आणि राम कदमांच्या एखाद्या टपोऱ्या कार्यकर्त्याला ती आवडली आणि मागणी घातली तर त्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून द्यायचे का ? जर त्या मुलीचे आईवडील नाही म्हणाले तर त्या मुलीचे अपहरण करणार का ? याचे उत्तरही कदम यांनी द्यायला हवे. 
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, अनुताई वाघ, तारा मोडक, गोदाबाई परुळेकर आदी रणरागिणींचा हा महाराष्ट्र. त्याच मराठी मुलुखात मुली उचलण्याची भाषा जर कोणी करीत असेल तर ती कदापि सहन करता कामा नये. कदम जेथे जातील तेथे महिलांनी त्यांना हिसका दाखविलाच हवा. म्हणजे पुढे कोणी अशी विधाने करताना धजावणार नाही. 
इतिहासात डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की ज्यांनी वाणीवर संयम ठेवला, त्यांच्या चरित्राचे गायन आजही केले जाते. बोल कसे असावेत शांतीयुक्त,आदरयुक्त, स्नेहयुक्त. वाणीत जर सभ्यता असेल तरच तुमचे बोल हिरे व मोती पेक्षा अधिक मूल्यवान मानले जातील. म्हणून तोडणं अधिक सोप असतं आणि जोडणं खूप कठीण असतं. 
म्हणून आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाऊ नये ही सांभाळण्याची जबाबदारी राम कदम यांच्यासह आपल्या सर्वांचीच आहे. त्यासाठी एकाच गोष्टीची आवश्‍यक्ता असते ती बोलण्यावर, जीभेवर संयम ! 

Tuesday, August 21, 2018

डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांनो,

"" पोरानो, एका डॉक्‍टरची हत्या करून तुम्ही मोकळे झालात. पण, तुम्ही दररोज किती माणंस मारत आहात. याची कल्पना तुम्हाला कदाचित नसेल. अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने किती लोकांचे संसार उद्‌ध्वस्त होतात हे तरी कधी पाहिलं अनुभवलं आहे का ? यासाठीच हा पत्रप्रपंच !



सचिन, "" तू डॉक्‍टरसाहेबांवर गोळ्या झाडल्या पोलिसांचे म्हणणे आहे. तू सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेस. तुझ्या अटकेनंतर तुझ्या पत्नीने तू निरपराध असल्याचे म्हटले आहे. तुला एक गोड मुलगी आहे. तसेच तुझी आर्थिक परिस्थिती कशी आहे याविषयीची माहिती वाचण्यात आली.

सचिन, तुझ्यासह जे तुरुंगात आहोत त्यांच्याविषयी वाईट वाटले. तुम्ही हे काय करून बसलात पोरांनो ! हा प्रश्‍न
तुमच्या आईवडिलांना पडला असेल. जी मुलं सामान्य कुटुंबातील आहेत. गरीब आहे. ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांच्या मस्तकात कोण विष पेरते आहे. आपणास कोणीतरी उद्‌ध्वस्त करण्यास निघाले आहे हे वेळीच तुमच्या का लक्षात आले नाही असे प्रश्‍न समाजमनालाही पडले असतील.

"" सचिन, तुझा चेहरा पाहिला तर तू गुन्हेगार आहेस असे वाटतही नाही. किती कमी वय आहे तुझं ! आयुष्य किती सुंदर आहे. खूप चांगलं आयुष्य जगायचे स्वप्न पाहण्याऐवजी पोरांनो तुम्हाला हातात शस्त्र का घ्याव वाटलं. काय मिळाले तुम्हाला ! पोलिसांचा प्रसाद, बदनामी, गुन्हेगार, खुनी.....!

डॉक्‍टरसाहेबांशी तुमचं कसलं वैरत्व होतं. कोणत्या प्रॉपर्टीवरून भांडण होतं. तुमच्या शेतीच्या बांधाला डॉक्‍टरांचा बांध नव्हता. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कोण आहेत हे तरी माहीत होतं का ? ते नेमकं काय करीत होते. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे नेमकं काय असतं याचा तरी अभ्यास केला होता का ? की या कशाशीच तुमचं काही देणंघेणं नव्हतं. तुम्हाला एखाद्यानं सांगितलं की घाल यांना गोळ्या म्हणून घातल्या का गोळ्या ? असे एक ना अनेक प्रश्‍न हजारो लोकांना पडले असतील. या प्रश्‍नांची उत्तर कदाचित तुम्हाला नाही रे देता येणार !

गेली चार दशकं डॉक्‍टरसाहेब चंदनासारख तुमच्याआमच्यासाठी झिजत होते. लोकांनी शहाणे व्हावे, शिकावे, अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडून प्रकाश पाहावा, बाबाबुवा, भूत, करनी, चेटकीन किंवा गंडादोऱ्याबरोबर व्यसन करू नका! दारू पिऊ नका म्हणून ते तळमळत होते. काय चूक होती त्यांची ? डॉक्‍टरसाहेब ज्या जातीत जन्माला आले त्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. पण, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजन समाजाच्या जागृतीसाठी त्यांनी डोळ्यात तेल घातले. अभ्यास, चिंतन, प्रयोग, भाषण, लिखाण, प्रबोधन काय म्हणून करायचे ठेवले होते.

समाजाने जे जे दिले ते समाजालाच परत देत गेला हा भला माणूस ! खरेतर पत्नी, दोन सुंदर मुलं. स्वत: पेशाने डॉक्‍टर. सुखासमाधानाने जीवन ते जगू शकत होते. घोडागाडी, धनदौलत संपत्तीत कदाचित लोळणही घेऊ शकले असते. पण, सुखाच्या मागे हा माणूस लागला नाही. उलट पायाला भिंगरी बांधून डोक्‍यावर बर्फ ठेवून तो लोकांसाठी भटकत राहिला. प्रत्येकाचा विवेक कसा जागृत होईल याचे प्रबोधन करीत राहिला.

असंगाशी संग केल्याने काय होतं याचा अनुभव आपण घेत असालच. तुम्ही तुरुंगात खितपत पडणार. वृद्ध आईवडील, पत्नी, मुलांचे काय होईल याचा किंचितही विचार तुम्ही का नाही केला ? कोण आहे तुमच्या पाठीशी ! आणखी किती दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे हवे आहेत.

पोरांनो, एक गोष्ट सांगतो. गांधीजींची हत्या करून नथुराम मोठा नाही होऊ शकला. जगभरात जेथे सूर्याची किरणे पोचतात तेथे गांधीबाबाच पोचला. हे तुम्हाला कोण सांगणार ? एखाद्याची हत्या करून त्याचे विचार संपविता येत नाही हे कोणी कसे तुम्हाला सांगितले नाही. चांगलं वागणं किती अवघड असतं हे कदाचित तुमच्या आईने किंवा शिक्षकांने लहानपणी सांगितलेले आठवत असेल. वाईट वागणं किती सोप असतं. खून करणं तर त्याहून सोप असतं. ज्यांनी तुम्हाला या मार्गाला लावले ते कुठेच पिक्‍चरमध्ये नाहीत. कदाचित त्यांचेही चेहरे पुढे येतील किंवा येणारही नाहीत. पण, तुमचं काय ?
आज तुम्ही संशयित आरोपी आहात. भविष्यात न्यायालय जो काही निकाल द्यायचा तो देईलच. पण, तुमच्याकडे आज तरी संशयाची सुई आहे. तुम्ही गुन्हेगार असाल किंवा अन्य कोणी असू शकते. पण, डॉक्‍टरसाहेब इतके वाईट होते का ?

दाभोलकरांवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांचे कर्तृत्व तरी काय ? तुम्ही भेकड आहात ? गोळ्या घालून तुम्ही पळून न जाता थेट पोलिसात गेला असता तर तुमची हिम्मत मानली असती. खून करता आणि बिळात पाच वर्षे लपून बसता. तुम्ही भित्रेच आहात. एका विचारवंताला, समाजसेवकाला, अजातशत्रूला, समाजाचे अश्रू पुसणाऱ्या एका हडकुळ्या माणसाला मारून तुमच्या हाती काहीच लागले नाही.

उलट तुमचे हात रक्ताने माखले. तुमच्या कपाळावर खुनाचा कलंक लागला. तुमच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत तो पुसला जाणार नाही. मात्र एक खरे सांगतो, की डॉक्‍टरसाहेब मेलेले नाहीत तर ते दररोज कुठे ना कुठे दिसत असतात. लोकांमध्ये वावरत असतात. पुस्तकाच्या रूपाने ते भेटत असतात. डॉक्‍टरांची मुशाफिर काही केल्या थांबणार नाही. कोणी थोपवू शकेल असे वाटत नाही.
कळावे
तुमचा विश्वासू

एक सामान्य माणूस

Sunday, August 19, 2018

छिंदम आणि मतीन हे एकाच माळेचे मणी !



छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाष्य करणारा नगरचा छिंदम असेल किंवा ऋषितुल्य अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास विरोध करणारा "एमआयएम'चा नगरसेवक सय्यद मतीन असेल. आपण काहीही बोललो तर लोक खपवून घेत नाही. तर तुडवतात याचा अनुभव या दोघांनाही आला. म्हणूनच समाजाचे जे दैवत किंवा आदर्श आहेत त्यांच्याविषयी जीभ घसरू द्यायची नाही याची खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी.




आत्मा हा अमर आहे. मृत्यूनंतर सर्वकाही क्षम्य असते असे तत्त्वज्ञान आपला हिंदू धर्म सांगतो. जे हिंदू धर्माचे तेच इस्लाम, ख्रिस्ती असेल किंवा अन्य कुठलाही धर्म. प्रत्येक धर्मात मानवतावादाला स्थान आहे. राजकारण तर असे क्षेत्र आहे, की जेथे विरोध, आरोपप्रत्यारोप अगदी टोकाचे मतभेद असतात. हे मतभेद काही भिन्न विचारसरणीच्या पक्षांतच असतात असे नव्हे. तर एखाद्या पक्षांतर्गतही असतात.

सत्तेसाठी म्हणजेच सरपंच, जिल्हापरिषद सदस्यापासून ते आमदार, खासदार, मंत्रिपदापर्यंत स्पर्धा असते. या स्पर्धेमुळे अगदी जीवश्‍चकंठश्‍च मित्र असलेले नेतेही एकमेकांचे तोंड पाहत नाही. हे सर्व आपण पाहत असलो तरी काही मंडळी त्याला अपवाद असतात. अगदी भिन्न विचारसरणी असलेले दोन पक्षाचे नेते परममित्र असू शकतात. मैत्री आयुष्यभर जपलेले. मैत्रीत कुठेही कटुता येणार नाही. याची काळजी घेतलेले नेतेही असतात.

भारताचा विचार केला तर येथे भिन्न विचारसरणी, विविध धर्म, प्रांत, जातीपाती पिढ्यान्‌पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आल्या. राजकारणाचा विचार केला तर भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट आदी एक ना अनेक पक्ष आहेत. या सर्वच पक्षांचे नाते जगजाहीर आहे. कम्युनिस्टांनी तर आपले तत्त्व कधीच सोडले नाही. या पक्षाने कधीच हिंदुत्वाच्या मांडीला मांडी लावली नाही. मात्र द्वेष, कटुता नव्हती. अटलबिहारी वाजपेयींचे मोठेपण डाव्या नेत्यांनीही मान्य केले. किंवा डाव्यांची तत्त्वनिष्ठा, साधेपणा भाजपमधील नेत्यांना मान्य नव्हती असेही काही समजण्याचे कारण नाही.

मृत्यूनंतर तर झाले गेले गंगेला मिळाले. असे समजले जाते. त्याला श्रद्धांजली अर्पण केली जाते. हीच आपली संस्कृती आणि परंपराही. या परंपरेला छेद देण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करीत असतात. अटलबिहारी वाजपेयींसारखा जननायक अनंतात विलीन झाल्याने संपूर्ण देश दुख: सागरात बुडाला. वाजपेयी तर असे आदर्श व्यक्तिमत्त्व होते की ते नेहमीच पक्षापलिकडे जाऊन विचार करीत. असे असताना "एमआयएम' सारख्या पक्षाचा एक नगरसेवक अटलजींना श्रद्धांजली अर्पण करण्यास नकार देतो हे संताप आणणारे आहे. औरंगाबादमधील सर्व पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली ते बरेच झाले. मतीन या नगरसेवकाला भाजप-शिवसेना नगरसेवकांनी चोपही दिला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाष्य करणाऱ्या नगरच्या छिंदमलाही असाच चोप दिला होता हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. मतीन असो की छिंदम याची जातकुळी एकच आहे.

कुठे आणि कधी काय बोलावे. काय बोलू नये याचा सारासार विचार खरे तर प्रत्येकाने करायला हवा. मराठीत एक म्हण आहे, "" तोंड बोलते आणि अंग मार खाते'' या म्हणीचा अनुभव "एमआयएम'च्या या नगरसेवकाला आला असेल. तसाच अनुभव नगरच्या छिंदमलाही आला. म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज असोत की वाजपेयी. ज्या कोट्यवधी लोकांच्या हृदयात ज्यांना आदराचे स्थान आहे. त्यांना धक्का लावण्याचे किंवा त्यांची निंदा करण्याचा अधिकार यांना दिला कोणी ? महान मानवांविषयी विष ओकणाऱ्यांना लोक कसे तुडवतात याचा अनुभव आपण पुन्हा एकदा औरंगाबादेत घेतला. खरेतर "एमआयएम' च्या नेत्यांनीही या नगरसेवकांवर कठोर कारवाई करायला हवी.

मतीन यांच्या अशा विचित्र वागण्यावरून संताप आणि चीड निर्माण केली जात आहे. तसाच संताप काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात व्यक्त केला गेला याची आठवणही आज झाली. ज्येष्ठ समाजवादी नेते ना. ग. गोरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याविषयी शिवसेनेच्या मुखपत्रात भोंदूना श्रद्धांजली कशासाठी ? असा जहाल लेख प्रसिद्ध झाला होता. निधनानंतर गोरेंची हेटाळणी करण्यात आली होती. त्यांना भोंदू म्हणणाऱ्यांनाही निषेध करण्यात आला होता. हे ही लक्षात घेण्याची गरज आहे. वाजपेयींच्या बाबतीत मतीन जे बोलला तेच ना. ग. गोरेंविषयी घडले असे आपण आज म्हटले तर चालेल का ?

खरेतर मतीन याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. आपण एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्याची हेटाळणी करतो. त्याला ढोंगी म्हणतो किंवा त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यास विरोध करतो. याचे तरी कसे समर्थन करता येईल. असो.

राजकारण, समाजकारण असो की अन्य कोणतेही क्षेत्र. आपल्या आचारविचाराने समाजमनावर ज्यांनी प्रभाव टाकला. द्वेषाचे, सुडाचे राजकारण ज्यांनी कधीच केले नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून राज्याच्या देशाच्या हितासाठी आपले आयुष्य खर्ची केलेल्या त्यागी माणसांचा आपला देश. मग ती माणसं कोणत्याही धर्माची किंवा पक्षाची असोत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरी सार्वजनिक जीवनात वाटचाल करायला हवी. विशेषत: लोकप्रतिनिधींनी तर वाणीवर नियंत्रण ठेवायला हवे ! एखादी गोष्ट पटत नसेल तर मौन पाळणे योग्य होईल. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी का ? याचा विचार ज्याने त्याने करायला हवा ! तसे झाले नाहीतर "लाथो के भूत बातोसे नही मानते' असे समजून जनता वाचाळ नेत्यांना तुडवतच राहील ! त्यामुळेच जिभेवर लगाम ही हवीच !

Friday, August 17, 2018

मराठी बोलणारे "पीएम'

मराठी माणूस आजपर्यंत देशाचा पंतप्रधान होऊ शकला नाही याचे शल्य मराठी मनाला आहे. पण, गेल्या साठ सत्तर वर्षात देशाला जे पंतप्रधान म्हणून लाभले त्यापैकी अटलबिहारी वाजपेयी आणि नरसिंहराव या दोन माजी पंतप्रधानांना मराठी चांगले येत होते. ते मराठी बोलत होते. याचा अभिमान नक्कीच मराठी माणसाला आहे. 
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान नरसिंहराव हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. पंतप्रधान झाल्यानंतरच ते आंध्रप्रदेशातून मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले होते. त्यांच्याप्रमाणेच कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे ही वाशीम लोकसभा मतदारसंघातून निवडून येत होते. राव हे मूळचे आंध्रप्रदेशचे तर आझाद हे जम्मू-काश्‍मीरचे. पण, खासदार म्हणून ते दोघेही महाराष्ट्रातून निवडून येत. दिल्लीत हे दोघेही महाराष्ट्राचे खासदार म्हणून ओळखले जात. 
वाजपेयींचे तसे नाही. ते महाराष्ट्रातून कधीच निवडून आले नव्हते. परंतु, वाजपेयींचे मराठीवर प्रेम होते. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि येथील संत परंपरेवर ते भरभरून बोलत. महाराष्ट्र ही संतांची आणि शुरांची भूमी आहे हे वाक्‍य अटलजींच्या भाषणात ऐकण्यास मिळत असे. वाजपेयींचे महाराष्ट्रात कोठेही भाषण असेल तर मराठीचा उल्लेख केल्याशिवाय ते आपले भाषण संपवत नसंत. 
भाजपमधील वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ही जोडी पक्षाचे शक्तीस्थळ होते. अडवानींचे विशेषत: इंग्रजी आणि हिंदीतच भाषण होत असे. माजी आमदार अरविंद लेले यांच्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अडवानी हे पुण्यात आले होते. त्यावेळी ते जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा अडवानी म्हणाले, "" मी हिंदीतच बोलणार आहे. मी महाराष्ट्रात आहे. खरेतर मला मराठी बोलता येत. पण, अटलबिहारी वाजपेयी हे चांगले मराठी बोलतात. त्यांना चांगले मराठी येते.'' वाजपेयींना मराठी येते याचा आनंद अर्थात अडवानींना होता. 
दुसरा कार्यक्रम मुंबईतले होता. संत रोहिदास याच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला अटलजी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम होता. त्यावेळी नितीन गडकरी तेथे उपस्थित होते. आयोजकांनी गडकरींना भाषणासाठी निमंत्रित केले असता गडकरीनी माईक हातात घेतला आणि ते म्हणाले,"" तुम्ही अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात. त्यामुळे मी तुमचा वेळ घेत नाही. माझ्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत. माझे भाषण संपले.'' त्यावेळी श्रोत्यांनी गडकरींना प्रतिसाद दिलाच पण, त्यानंतर वाजपेयींनी संत रोहिदास यांच्यावर केलेले भाषण आठवते. त्या भाषणातही अटलजींनी मराठी संतानी केलेल्या कार्याचा उल्लेख करीत मराठीचे मोठे सांगितले. मराठी भाषा किती गोड आहे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 
वाजपेयींप्रमाणे मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असलेले दुसरे पंतप्रधान म्हणजे नरसिंहराव. ते अनेक वर्षे महाराष्ट्रातूनच निवडून येत असल्याने त्यांना चांगले मराठी येत असावे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कृष्णाकाठच्या कराड भूमीत मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्‌घाटन नरसिंहराव यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी राव यांनी मराठीत केलेले भाषण तर मराठी माणसाला कदापि विसरता येणार नाही. महाराष्ट्राचे नसताना. मराठी मातृभाषा नसताना या दोन्ही पंतप्रधानांना चांगले मराठी येत होते हे प्रत्येक मराठी माणूस कदापि विसरू शकत नाही. 

Sunday, August 12, 2018

नाचता येईना, अंगण वाकडे !

सांगली आणि जळगाव महापाकिलेत शिवसेनेला मतदारांनी खड्यासारखे उचलून बाजूला ठेवले. पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेषत: सांगली हा तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला. या बाल्लेकिल्याला खिंडार पाडत भाजपने जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. आपल्याला लोक बाजूला सारत आहेत. लोकांचा आपल्यावरील विश्वास का उडाला ? सत्तेवर असताना आपल्या कोणत्या चुका झाल्या ? याचे आत्मचिंतन दोन्ही कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांबरोबर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनीही करायला हवे. 
आपला शब्द म्हणजे ब्रह्मवाक्‍य हा जो त्यांच्या मनात वर्षानुवर्षाचा समज होता. तो आता तरी मनातून काढून टाकला पाहिजे. हे झाले दोन्ही कॉंग्रेसचे. तेच शिवसेनेचे. "नाचता येईना अंगण वाकडे' ही म्हण शिवसेनेबाबत तर तंतोतंत लागू पडते. गेल्या चार वर्षातील शिवसेनेचे एकूणच वागणं आणि कार्यपद्धती लोकांच्या विशेषत: मतदारांच्या काही पचनी पडत नाही हे दिसून येत आहे. राज्यात युती असल्याने मुंबईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडा समजूतदारपणा दाखविला अन्यथा तेथेही कमळच फुलले असते हे सांगण्याची गरजही नाही. 
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना टोकाचा विरोध करून झोळीत काही पडणार नाही हे आता तरी शिवसेनेच्या नेतृत्वाने विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवे. शिवसेना आणि त्यांचे प्रवक्ते जे काही सांगत आहेत. जी भाषा बोलत आहेत ती लोकांच्या पचनी पडत नाही हे त्यांच्या कधी लक्षात येणार ! प्रत्येक गोष्टीला आणि दररोज भाजपचा द्वेष आणि हेटाळणी हा एककलमी कार्यक्रम शिवसेनेने चालविला आहे. त्याचे राजकीय फायदेतोटे किती याचा विचार पक्ष करेलच. भाजपमुळे शिवसेनेचे मुख्यमंत्रिपद गेले या एकाच शल्यापोटी सातत्याने विरोध करणे योग्य की अयोग्य हे एकदाचे ठरविले पाहिजे. 
शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचाच यासाठी जिद्द हवी आणि त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढतानाच राज्याचे हित कशात आहे हे तरुणांच्या मनात बिंबविले पाहिजे. फक्त हवेत फुसकेबार सोडून काहीही साध्य होणार नाही. गेल्या चार वर्षाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या हे लक्षात येईल की फडणवीसांनी राज्यात शांत चित्ताने कारभार केला. आरोपप्रत्यारोप झाले. हेटाळणी झाली तरी त्यांनी कधी संयम सोडला नाही. दोन्ही कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेचा उपद्रव अधिक झाला. तरीही त्यांनी शिवसेनेला बरोबरच घेण्याचे धोरण ठेवले. भाजपने कारभारावर लक्ष्य केंद्रित करून वाटचाल सुरू ठेवल्याने प्रत्येक टप्प्यावर पक्षाला फायदा होत गेला. 
आजपर्यंत राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. त्या तुलनेत शिवसेना आणि दोन्ही कॉंग्रेस पिछाडीवर गेल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी तरुणाईची मनेजिंकली आहेत. पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे असेच म्हणावे लागेल. 
शिवसेनेचे हभप, शिवचरित्राचे उपासक, फर्डे वक्ते, भल्याभल्यांच्या डोळ्यात आपल्या अमोघ वाणीने पाणी आणणारे नेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या खांद्यावर शिवसेनेने सातारा, सांगलीची जबाबदारी टाकली. वास्तविक ही जबाबदारी पेलणे म्हणावे तसे सोपे नाही. व्यासपीठावरून श्रोत्यांची मनं जिंकणं वेगळं आणि मतदारांची मनं जिंकणे यामध्ये जमीनअस्मानचा फरक आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यानंतर मतदार राजाला स्वपक्षाकडे वळविणे तसे कठीणच. नाटक, सिनेमात काम करणे ही कला असली तरी ती राजकारणाच्या मैदानातही चालते असे समजण्याचे कारण नाही. येथे सभा जिंकणे आणि वातावरण निर्मिती करणे जमावे लागते. 
नेत्यांनाही अभिनय करावा लागतो. नाटकबाजी करावी लागते हे खरे असले तरी नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षासाठी जिवाचे रान करावे लागते. अगदी यात्राजत्रा, बारसे, लग्नसमारंभ असो की एखाद्याचे निधन. नेत्यांना लोकांना सतत भेटावे लागते. त्यांचे रुसवेफुगवे काढावे लागतात. राजकारणात कष्ट हे आलेच. इतके करूनही अनेकदा लोक नाकारतात. चांगले काम करूनही अपयश मिळत नाही. तरीही यशापयश पचवत नेते पुन्हा राजकारणात सक्रिय होत असतात. 
भाजपने सांगली, जळगावात यश मिळाल्यानंतर बानुगडे पाटलांनी पराभव मान्य न करता पराभवाचे खापर ईव्हीएम मशिनवर फोडले. खरे तर पराभव पचविण्याची ताकद नेत्याकडे असायला हवी. एका पाठोपाठ एक विजय भाजप का खेचून आणत आहे. आपण कुठे कमी पडतो याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. एकेकाळी सांगली जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या सारख्या महान नेत्याने नेहमीच गोरगरिबांचे अश्रू पुसले. सत्तेचा उपयोग जनसामान्यांसाठी शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी केला. हीच त्यांची ताकद होती. त्यांच्या पश्‍चात सांगली चांगली नाही राहिली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे पाहिले तर त्यांच्यावर विश्वास ठेवायला कुठेही जागाच नव्हती. सांगलीचा आज चेहरामोहरा पाहिला तर हीच का दादांची सांगली असे म्हणावे लागेल. 
पतंगराव कदम, आर.आर.पाटील, जयंत पाटील यांच्यासारखे बडे नेते वर्षानुवर्षे सत्तेत राहिले. मात्र या शहराचा चेहरा कधी उजाळलाच नाही. अंतर्गत मतभेद शहकाटशहाच्या राजकारणाने जिल्ह्याचे नुकसान झाले. येथे वतनदार निर्माण झाले. त्यामुळे कॉंग्रेसचा बालेकिल्ला आज भाजपमय झाला. आज जे नेते भाजपमध्ये आहेत त्यांच्याकडे पाहिले तर ते कोण आणि कोठून आले याचे उत्तर सोपे आहे. त्यांचे मूळ कॉंग्रेसीच आहे. हे खरे असले तरी भाजपने त्यांना आपलेसे करून घेतानाच येथे पक्षाचा झेंडा रोवला. तो फडकविला हे सोपे काम नव्हते. 
जे भाजपने केले ते शिवसेनेला कधीच जमले नाही. नितीन शिंदे सारख्या नेत्याला आमदारकी दिली पण, काहीच उपयोग झाला नाही. पश्‍चिम महाराष्ट्राचा गड शिवसेना काबीज करू शकली असती. त्याकडे कधी पक्षनेतृत्वाने गंभीरपणे पाहिले नाही. सातारा, कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. सांगलीतही शक्‍य झाले असते. परंतु पेरणी बरोबर झाली नाही. 
जळगाव, सांगलीचे निकाल जाहीर होताच शिवसेना भाजपवर पुन्हा एकदा तुटून पडली. पराभवाचे खापर ईव्हिएम मशिनवर फोडून मोकळी झाली. खरेतर हा आरोप 
हास्यास्पद आहे. सांगलीत शिवसेनेची ताकद काय आहे हे सर्वांनाच माहीत आहेत. नशीब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही ठिकाणी गेले नाहीत. अन्यथा सांगलीचा आकडा आणखी वाढला असता. दोन्ही कॉंग्रेसची धुळधाण उडाली असती. 

नियम पाळणाऱ्यांसाठी असतात ?



पुण्यातील दगडूशेठ गणपतीजवळ पोलिसांनी सिग्नल तोडणाऱ्याला पकडले आणि त्याच्याकडून दंड वसूल केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या पोलिसाने दंड भरलेल्या व्यक्तीला दोन शहानपणाच्या गोष्टी ऐकविल्या.
तो पोलिस म्हणाला, "" आपण नियमाचे उल्लंघन करता, दोष मात्र पोलिसांना देता. कारण पैसे भरावे लागले म्हणून. आपण भारतीय इतर देशाचे कौतुक करतो. आपल्या पेक्षा ते बरे असे म्हणतो. पण, आपण जर नियम पाळले तर आपला देशही भारी आहे हे का लक्षात घेतले जात नाही !'' 
हा ब्लॉग लिहिताना खरे तर त्या पोलिसाची आठवण झाली. वाहतुकीचे नियम न पाळल्याने काय होते. तर होत्याचे नव्हते होते. एखादा भीषण अपघात होतो आणि एखादे कुटुंबच संपते. हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांना किंमतही मोजावी लागते. अशा एक ना अनेक घटना दैनंदिन जीवनात घडत असतात. 
काही वर्षापूर्वी साताऱ्याजवळील खंबाटकी घाटातील अपघात असेल किंवा नुकतीच पोलादपुरजवळील घटना असेल. सलमानने बेधुंद होत फुटपाथवरील लोकांना चिरडणे असेल. "व्हीव्हीआयपी'च्या गाड्यांचे सारथ्य करणाऱ्या चालकांना आपण कोणी तरी चारचौघांपेक्षा वेगळे आहोत हा गैरसमज असतो.
विशेषत: राजकारण आणि बॉलिवूडमधील ग्लॅमर नेते, अभिनेत्यांचे चालक तर हवेतच असतात. आम्ही बड्या मंडळींकडे आहोत. त्यामुळेच आम्ही कसेही वागणार हे आलेच. नियम तोडला की पोलिस, आरटीओ अधिकारी यांना दोनशे, चारशे रुपये दंड म्हणून भरणे हे त्यांना भूषणावह वाटते. 
वाहतुकीचे नियम सर्व सामान्य माणसं पाळत असतात. चुकून जरी सिग्नल तोडला तर तो जो काही दंड असतो तो इमानेइतबारे भरत असतो. तर दुसरीकडे भाई, दादा, काका आदी नेत्यांचे शिलेदार असे दंड भरण्यास तयार नसतात. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर तो रुबाबात उभा राहतो, डोळ्यांवरील महागड्या गॉगलमधून पोलिसांकडे नजर टाकतो. आपल्या गॉडफादरला फोन करतो. पोलिसांच्या हातात देतो. तिकडून फोन येतो. माझा माणूस आहे. कार्यकर्ता आहे. सोडा त्याला!
काहीवेळा दंड भरणे राहते दूरच. तो रुबाबात गाडीवर बसून निघून जातो. खरे तर पोलिसांनी अशा भाईदादांना धडा शिकविणे अपेक्षित असते. तसे होत नाही. राजकारणामुळे पोलिसांचे हातही बांधले जातात. पुण्यातील बीआरटीमध्ये अशाच भाईंच्या गाड्या बिनधास्त घुसतात. त्याही भरधाव वेगात. पण, बोलणार कोण ? असो. 
मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड न भरणाऱ्यांच्या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे परिवहन खात्याचे मंत्री असलेल्या दिवाकर रावते यांचे नाव या यादीत यावे याचेही आश्‍चर्य वाटते. 
नेते असोत की अभिनेते ही मंडळी आपल्या आचरणाने समाजात आदर्श निर्माण करतात. जरी अनावधनाने नियम तोडले असले तरी ते मान्य करून हो ! मी चुकलो. 
! दंड भरण्यास तयार आहे अशी भूमिका घेणे गरजेचे आहे.
हे राहिले बाजूलाच. उलट ज्या गाडीचे नंबर जाहीर झाले ती गाडी आम्ही विकली किंवा चालकाने नियम मोडला असे उत्तर देऊन आपण कसे नियमांचे पालन करतो हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.मध्यंतरी एका खासदाराने टोल नाक्‍यावर घातलेला धुडगूसही आठवत असेलच. अगदी टोलवरून टोले दिल्याची घटना घडली होती. 
आज मुंबई असो की पुणे. वाढत्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. गाड्या रॅश चालविणे, वेगावर मर्यादा नसणे, रोड सायन्स रोड सिग्नलचे नियम माहीत नसणे, सुरक्षित अंतर न ठेवणे. धोक्‍याच्या वळणावर दक्षता न घेणे. सिग्नल तोडणे यामुळे दररोज अपघात घडत असतात. दुचाकी, चारचाकी कशी चालवायला हवी याचे ज्ञान न घेणे यामुळे अपघात होतात आणि लोक जीव गमावून बसतात. 
सामान्यांनाबरोबरच नेते किंवा अभिनेत्यांनी वाहतुकीचे नियम हे पाळलेच पाहिजे. "व्हीआयपी' कल्चरमुळे तर शहरात अनेकवेळा सामान्य लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागते. "व्हीव्हीआयपी' मुळे वेळेवर रुग्णालयात दाखल न करता आल्याने रुग्णाला वाटेत अखेरचा श्‍वास घ्यावा लागला होता अशा घटनाही देशात घडल्या आहेत.
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर एकदा आदेशच काढला होता की माझ्यामुळे ट्रॅफिक थांबवू नका. मला उशीर झाला तरी चालेल. लोकांना वेठीस धरू नका. बॅनर्जींचा आदर्श आपल्याकडील मंडळींनीही घ्यायला काही हरकत नाही. 
इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी महत्त्वाची अपॉइन्टमेंट साधण्यासाठी भुयारी रेल्वेने प्रवास केला होता. तेव्हा कोैतुकाने प्रवाशांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले होते.
आपल्याकडे निवडणुका आल्या की नेते रेल्वेने प्रवास करतात. सोबत कार्यकर्त्यांना लवाजमा असतो. फोटोग्राफर असतात. हे फोटो काही वेळातच मीडियाकडे कसे पोचतात. ते कसे प्रसिद्ध होतात हे आपणास नवे नाही. परंतु, नेत्यांना आपण सर्वसामान्य नागरिक आहोत याचे भान कधी येणार हा प्रश्‍न आहेच. 
लोकशाहीत कायद्यासमोर सर्वजण समान हवेत. प्रत्येकाने कायद्याचे पालन हे केलेच पाहिजे. अन्यथा नियम हे पाळणाऱ्यांसाठी असतात. ते तोडणाऱ्यांसाठी नसतात. म्हणजेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना शिक्षा. अप्रामाणिकांना बक्षीस असे होता कामा नये.
नेते असोत की अभिनेते जर त्यांनी नियमाचे उल्लंघन केले असेल तर दंड भरायलाच हवा. चूक कशीही होवो. दंड म्हणून दिलेली शिक्षा मोठ्या मनाने मान्य केली पाहिजे. ती चूक तुमच्या चालकाने केलेली असो की तुम्ही ! कारण तो चालक तुमचाच आहे. त्याची चूक ही माझीच आहे हे सांगण्याचे धाडस ज्यांची या यादीत नावे आली आहेत त्यांनी दाखवायला हवे !