Sunday, October 29, 2017

कोंबडी चोर कोण ?

कोंबडी चोर असे कोकणात बरेच वेळा बोलले जाते. पोलिसांनाही पांडू किंवा सखाराम म्हणून चिडविले जाई. सखाराम म्हटल्याचे ऐकले आणि म्हणणारा जर सापडला तर पोलिस त्याची धुलाई करीत. आज पांडू, सखाराम, कोंबडी चोर सगळं मागे पडले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंना म्हटले होते म्हणूनच कोबंडी चोराची चर्चा सुरू आहे. काहीही असो "कोंबडी' मात्र राणेंची आजही पाठ सोडायला तयार नाही ?

- प्रकाश पाटील


रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर, ठाणे हे पाच जिल्हे कोकणाचे म्हणून ओळखले जातात. कोकणाच्या लाल मातीचा रंग काहीसा वेगळाच. अथांग पसरलेल्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर विविधतेने नटलेले हे जिल्हे. कोकणी माणूसही अगदी फणसा सारखा. वरून काटेरी आणि आतून फणसासारखा गोड आणि रसाळ. जो कोणी कोकणात राहिला आणि वाढला त्याचा कोकणचा आणि कोकणी माणसाचा कदापि विसर पडणार नाही. या चारही जिल्ह्यात अनेक जाती आहेत. आदिवासी, भंडारी, हेटकरी भंडारी, आग्री, वाडवळ (पाच कळशी वै.),वंजारी, मराठा, सारस्वत अशा जातीजमातीही पिढ्यानपिढ्या लालमातीत गुण्यागोविंदाने नांदत आल्या. काही गममीजमतीही खूपच असतात. किस्से असतात, खोडकरपणा, कोकणच्या टिपिकल शिव्यां आणि भांडणाची तऱ्हाही काही औरच.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नेते होऊन गेले की त्यांची कोणाला आठवण झाली नाही असे होत नाही. कालप्रसंगे ते आठवतात म्हणजे आठवतात. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडत होते. राणे अस्त्राने ते घायाळ झाले होते. तेंव्हा बाळासाहेब उद्धव यांच्या मदतीला धावले. त्यांनी राणेंवर टीका करताना पहिला पंच दिला होता तो म्हणजे " काय म्हणतो हा दीडफुट्या ' आणि त्यानंतर "कोंबडी चोर' म्हणूनही दुसरा टोला हाणला. त्यावेळी राणेंनी कोणाची कोंबडी चोरली होती ? याचीच चर्चा अधिक होती. आता शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी राणेंना "कोंबडी चोर' म्हटले आहे.

काय आहे हे कोंबडी चोरप्रकरण ? असा प्रश्‍न साहजिक लोकांना पडला असेल. कोकणात पूर्वी घरोघरी कोंबड्या पाळल्या जात. खुराडे बाहेरच असतं. पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळी मध्यरात्रीपर्यंत जागत असायचे. गप्पागोष्टींचा फड गाजायचा. लोक झोपी गेले की खोडकर कार्यकर्ते गुपचूप खुराड्यातील कोंबड्या चोरायचे. रात्रीच पाव वैगेरे आणून कोंबडीचा रस्सा आणि चिकन खाण्याचा आनंद लुटत असतं. पहाट झाले की हे कार्यकर्ते घरी जावून झोपत. सकाळी कोंबडी खुराड्यात दिसली नाही की कोंबडीची मालकीन जी शिव्यांची लाखोली वाहायची. कोणावरही शंका घ्यायची. भांडण व्हायचे. असल्या गमती काही वर्षापूर्वी चाळीत, गल्लीत चालत असत. प्रत्येकाने कधी ना कधी तरी कोंबडी चोरलेली असायचीच. तसे जुने जाणते कार्यकर्ते आजही सांगू शकतील. कधी कधी तर कोंबडी चोरतानाही रंगेहात पकडले जात असे. त्यावेळी कोंबडी चोरणाराचे काय होत असेल याचा विचारच केलेला बरा !

प्रत्येक गल्लीबोळात असे एक ना अनेक कोंबडी चोर होऊन गेले असतील. राणे अगदी तरूण कार्यकर्ते असतील तेंव्हा कधी तरी कोंबडी चोरीची घटना घडली असावी आणि ती त्यांनी गमतीने बाळासाहेबांना सांगितलेली असावी. बाळासाहेबांनी ते चांगले लक्षात ठेवले असावे. जेंव्हा राणेंवर प्रहार करण्याची वेळ आली तेंव्हा त्यांनी "कोंबडी चोर' म्हणून त्यांची टर उडविली. कोंबडी चोरणे ही गमत किंवा खोडकरपणा असायचा.

कोंबडी चोर असे कोकणात बरेच वेळा बोलले जाते. पोलिसांनाही पांडू किंवा सखाराम म्हणून चिडविले जाई. सखाराम म्हटल्याचे ऐकले आणि म्हणणारा जर सापडला तर पोलिस त्याची धुलाई करीत. आज पांडू, सखाराम, कोंबडी चोर सगळं मागे पडले आहे. बाळासाहेबांनी राणेंना म्हटले होते म्हणूनच त्याची चर्चा सुरू आहे. काहीही असो "कोंबडी' मात्र राणेंची आजही पाठ सोडायला तयार नाही असे म्हणावे का ?